पोलिस पाटलांसह कुटुंबियांना मारहाण : आरोपींना अटक


यावल : तालुक्यातील सावखेडासीम येथील पोलीस पाटील यांच्यासह त्यांच्या घरातील सदस्यांना वाळू वाहतूक करणार्‍यांच्या एका गटाने मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतांना अटक करण्यात आली. शुक्रवार, 2 जुलै रोजी रात्री आठ वाजता सुमारास सावखेडासीम येथील पोलीस पाटील पंकज जीवन बडगुजर हे आपल्या कुटुंबासोबत जेवण करीत असतांना गावातील प्रकाश सुभाष पाटील, दिलीप सुभाष पाटील, विकास पंडीत पाटील, विजय विकास पाटील, चेतन विकास पाटील यांनी त्यांच्या घरात अनधिकृत प्रवेश करीत तु आमचे रेतीचे ट्रॅक्टर तहसीलदारांना पकडण्यास सांगतो, असे बोलुन तु पोलीस पाटील कसा राहतो असे धमकावत शिवीगाळ केली तसेच पोलीस पाटील यांना खाटेच्या दांड्याने मारहाण केली. पोलिस पाटील यांच्या पत्नी पूनम जीवन बडगुजर व भाऊ जीवन दयाराम बडगुजर, राहुल जीवन बडगुजर हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. पोलीस पाटील पंकज जीवन बडगुजर (35) यांच्या फिर्यादीनुसार संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !