संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणेंसह पदाधिकार्यांविरोधात गुन्हा
भुसावळ : अॅट्रासिटी कायद्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात भुसावळचे माजी नगरसेवक व संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांच्यासह पदाधिकार्यांनी रविवारी दुपारी आंदोलन केले मात्र कोविड नियमांचे उल्लंघण करण्यात आल्याने तसेच प्रशासनाची परवानगी न घेत आंदोलन केल्याने सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सोनवणे व पदाधिकार्यांनी रविवारी दुपारी साडेतीन वाजता जुन्या पालिका कार्यालयासमोर आमदार गायकवाड यांच्या प्रतिमेला अंडे मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. आंदोलनासाठी प्रशासनाची परवानगी न घेता कोविड नियमांचे उल्लंघण केल्याने माजी नगरसेवक जगन सोनवणे यांच्यासह राकेश बग्गन, हरीष सुरवाडे, जयराम पुर्भी, चंदू भागेश्वर (सावदा), गोपी साळी (भुसावळ), आरीफ शेख (फैजपूर) व अन्य अनोळखी कार्यकर्त्यांविरोधात पोलीस कर्मचारी संदीप परदेशी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक तुषार पाटील करीत आहेत.




