यावल पालिकेच्या पाणीपुरवठा मक्तेदारावर तलवार हल्ला
यावल : शहरातील पालिका पाणीपुरवठा मक्तेदार व कर्मचार्यांमध्ये जलशुद्धीकरण केंद्रावर किरकोळ कारणावरून वाद झाल्याने एका कर्मचार्यांच्या मुलांसह एकाने येऊन पालिकेच्या खाजगी मक्तेदारावरच थेट तलवारीने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. प्रकरणी यावल पोलिसात आर्म अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यावल शहरातील जलशुद्धीकरण केंद्रावर शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता पाणीपुरवठा मक्तेदार कर्मचारी गणेश वसंत बारी (44) हे व अशोक त्र्यंबक चव्हाण (58) या नगरपालिका कर्मचार्यांमध्ये साठवण तलावावरील विद्युत फ्यूज उडाल्याने किरकोळ कारणावरून वाद झाला. प्रसंगी चव्हाण यांच्यासह त्यांची मुले नितीन चव्हाण, सचिन चव्हाण या तिघांनी जलशुद्धीकरण केंद्रावर गणेश बारी यांना तलवारीने व फायटर मारहाण केल्याने बारी यांच्या डोक्यावर जबरदस्त दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रात्रीच एक तलवार हस्तगत केली. या भांडणांमध्ये अशोक त्र्यंबक चव्हाण यांना देखील पायाला जबर दुखापत झाली तर चव्हाण यांना उपचार्थ जळगाव हलवण्यात आले. बारी यांच्या फिर्यादीवरून आर्म अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील करीत आहे.