माजी मंत्री खडसेंवरील ईडी चौकशीचा निषेध
भुसावळात तहसील प्रशासनाला निवेदन : तर आंदोलन छेडण्याचा इशारा
भुसावळ : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली मात्र सत्तेच्या दबावातून हा प्रकार घडत असून केवळ खडसे कुटुंबियांना त्रास देण्यासाठी भाजपा ईडीचा वापर करीत असल्याचा आरोप स्थानिक खडसे प्रेमींनी करीत या संदर्भात निषेध व्यक्त करीत तहसीलदारांना निवेदन दिले. हा प्रकार न थांबल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. दरम्यान, राजकीय दबावातून ईडी कार्य करीत असून भाजपच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी का नाही ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
पाच वेळा चौकशीनंतर पुन्हा चौकशी
भोसरीची जमीन एम.आय.डी.सी.ची नाही, सरकारची नाही शिवाय कोणत्याही प्रकारची भूसंपादनाची प्रक्रिया झालेली नाही. अथवा मूळ मालकाला जमिनी बाबतचा मोबदला सुद्धा दिलेला नाही. ही जागा एमआयडीसीचा ताब्यात नाही त्यामुळे हा व्यवहार संपूर्णपणे खाजगी स्वरुपाचा आहे. सरकारचे या व्यवहारामुळे काहीही नुकसान झालेले नाही. हा व्यवहारमंदाकिनी खडसे व गिरीश चौधरी यांच्या नावाने असून तो अधिकृत आहे. त्यासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी सुद्धा रीतसर भरण्यात आली आहे शिवाय एकनाथ खडसे यांचा या व्यवहाराशी कोणताही संबंध नाही त्यांच्या नावाने व्यवहार झालेला नाही. असे असताना जाणीवपूर्वक ईडी कडून त्यांना बोलावण्याचा प्रश्नच काय ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. वास्तविक पाहता या प्रकरणात 2016 पासून पाच वेळा चौकशी झाली आहे. न्या.झोटिंग कमेटी, बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे, आयकर विभाग, अँटी करप्शन ब्युरोकडून चौकशी होऊन एसीबी मार्फत क्लोजर रीपोर्ट पुणे कोर्टात सादर करण्यात आलेला आहे. या चौकशीत कोणतेही तथ्य आढळले नसल्याचाही दावा निवेदनातून करण्यात आला आहे.



निवेदन देताना यांची उपस्थिती
प्रा.डॉ.सुनील नेवे, प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, पुरूषोत्तम नारखेडे, नगरसेवक किरण कोलते, दिनेश नेमाडे, देवेंद्र वाणी, किशोर पाटील, गणेश निमसे, अमोल इंगळे, अॅड.बोधराज चौधरी, अनिकेत पाटील, वसंत पाटील, रमाकांत महाजन, मुकेश गुंजाळ, पृथ्वीराज पाटील, सागर जाधव, कोमल चौधरी, रमेश चौधरी, श्याम भारंबे, कल्पेश पाटील, विनय चौधरी, सुमीत बर्हाटे, प्रशांत अहिरे, संदेश सुरवाडे, एजाज खान, उस्माना खान, मुकेश पाटील आदींची उपस्थिती होती.

