मुक्ताईनगरातील वनदाव्यांचा प्रश्न निकाली काढा : जिल्हाधिकारी
भुसावळ : भुसावळ मुक्ताईनगर आणि बोदवड या तीन तालुक्यातील वन हक्क दाव्यांचा आढावा बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शहरात घेतला. यावेळी विभागातील तहसीलदार, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांची उपस्थिती होती. येथील प्रांताधिकारी कार्यालयात बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली भुसावळ मुक्ताईनगर आणि बोदवड या तीन तालुक्यातील वन हक्क समिती दाव्यांच्या आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, तहसीलदार दीपक धिवरे, मुक्ताईनगर आणि बोदवड येथील तहसीलदार तसेच लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भुसावळ आणि बोदवड तालुक्यातील 146 वनदावे जिल्हा समितीकडे पाठवण्यात आल्याचे प्रांताधिकारी यांनी सांगितले. मुक्ताईनगर येथील वनदावे आल्यावर त्यांचे निरीक्षण करून ते दावे सुद्धा जिल्हा कमिटीकडे पाठवले जातील, असे प्रांत यांनी सांगितले. येत्या दोन महिन्यात मुक्ताईनगर तालुक्यातील वन दाव्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी अधिकार्यांना यावेळी दिल्या.




