प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी रीपाइंची बोदवड शहरामध्ये निदर्शने
बोदवड : रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे बुधवारी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसरात निदर्शने करण्यात आली. यानंतर तहसीलदारांना मागण्याबाबत निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. रीपाइंने 9 जुलैला तहसीलदार, पालिका व पोलिस ठाण्यात निवेदन देत बोदवड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याविषयी व सुशोभीकरणाची मागणी केली होती. या निवेदनात डॉ.आंबेडकर पुतळ्यापासून काँक्रिटचा रस्ता होत असल्याने पुतळा सुशोभीकरणाचे नुकसान होईल. त्यातून अनुचित प्रकार होऊ नये म्हणून कंपनीच्या ठेकेदारासोबत तहसीलदार, पोलिस निरीक्षकांनी सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घ्यावी त्यानंतरच कामाची रूपरेषा आखावी, अशी मागणी केली होती. मात्र प्रशासनाने अजूनही बैठकीसाठी पुढाकार घेतला नाह. त्यामुळे रीपाइंने बुधवारी डॉ.आंबेडकर पुतळ्यासमोर दहा मिनिटे निदर्शने केली. यानंतर नायब तहसीलदार संध्या सूर्यवंशी यांना निवेदन दिले. रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, बोदवड तालुकाध्यक्ष संजय तायडे, राजू इंगळे, सदानंद वाघ, रूपेश मेढे व कार्यकर्ते उपस्थित होते.




