ग्रामीण भागात शाळांकडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ
भुसावळ : एकही कोरोना रुग्ण नसलेल्या ग्रामीण भागात गुरुवारपासून शाळा भरवण्यात येणार होत्या मात्र पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी शाळांकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. ग्रामीण भागात कोरोना नसलेल्या परीसरात आठवी ते बारावीचे वर्ग गुरूवारपासून सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली असलीतरी पहिल्या दिवशी तालुक्यातील सहा माध्यमिक शाळांचे वर्ग भरले मात्र तुरळक विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली. 22 मार्च 20 यादिवशी शाळा बंद झाल्या त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर 2020 मध्ये काही मोजकेच दिवस शाळा सुरू करण्यात आल्या मात्र कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे या शाळा पुन्हा बंद करण्यात आल्यात. त्यानंतर आताच 15 जुलैपासून आठवी ते बारावीपर्यतचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. गटशिक्षणाधिकारी बी.डी. धाडी यांनी ग्रामीण भागातील मुख्याध्यापकांशी संपर्क करून विद्यार्थी उपस्थितीची माहिती घेतली.




