यावलमधील दरोड्याप्रकरणी तिसरा संशयीत जाळ्यात
यावल : शहरातील मुख्य बाजारपेठेतील बाजीराव काशिदास कवडीवाले या सोने-चांदीच्या सराफी दुकानावर पडलेल्या दरोड्याप्रकरणी तिसरा पसार आरोपी यश विजय अडकमोल (22, रा.बोरावल गेट, यावल) यास अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरोड्याप्रकरणी आतापर्यंत एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दरोड्याप्रकरणी अटकेतील चंद्रकांत उर्फ विक्की चाले (लोणारी) यास शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्यास सहा दिवसांची म्हणजे 22 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी जाणून घेतले गुन्ह्याचे प्रात्यक्षिक
गुरुवारी चंद्रकांत उर्फ विकी सोमनाथ चाले (लोणारी) (रा.मोहित नगर, भुसावळ) यास दरोडा पडलेल्या सराफ दुकानात नेण्यात आले व प्रत्यक्षात गुन्हा कसा घडला ? याची माहिती जाणून घेण्यात आली. आरोपी दिललेया माहितीनुसार तापी नदीकिनारी साकेगाव शिवारात हनुमान मंदिराजवळील नाल्यात दाट झाडा- झुडपात टाकलेल्या नोटा जप्त करण्यात आल्या. पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, हवालदार संजय तायडे, असलम खान, भूषण चव्हाण, गणेश ठाकणे, सुशील घुगे, चालक राहिल गणेश यांच्या पथकाने 15 हजार 380 रुपयांची रक्कम जप्त केली.



