तहसील कार्यालयाच्या आवारातील सेतू सुविधा केंद्र सुरू करा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे जिल्हाधिकार्यांना निवेदन
भुसावळ : भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारातील तसेच संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्राचा करार मागील एका वर्षांपूर्वी संपल्याने सेतू सुविधा केंद्राचा संपूर्ण कारभार बंद आहे. आता दहावीचा निकाल लागला असून पुढील वर्षांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे मात्र सेतू सुविधा केंद्र बंद असल्यामुळे कागदपत्रे कशी मिळवावी? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे म्हणून तहसील कार्यालयाच्या आवारातील सेतू सुविधा केंद्र त्वरीत सुरू करावे, अशी मागणी भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे शहराध्यक्ष निलेश कोलते यांच्या नेतृत्वाखाली वाजीद खान, विवेक चौधरी, अक्षय पाटील, जितेंद्र सपकाळे, विशाल सुरवाडे, शेख वजीर यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे.
नवीन निविदा काढण्याचा विसर
शहरातील सेतू सुविधा केंद्राचा करार साधारण 30 जून 2020 रोजी संपलेला आहे. त्यानंतर महसूल विभागाने याकडे कोणतेही लक्ष दिलेले नाही. तसेच नवीन निविदा महसूल प्रशासनाने काढलेली नाही. कोरोनामुळे सर्व शाळा, कॉलेजमध्ये परीक्षा सुरू नसल्यामुळे त्या वेळी कागदपत्रे काढण्यासाठी विद्यार्थ्यांची फारशी गर्दी होत नव्हती. मात्र, आता दहावीचा निकाल जाहीर झाला असून लवकरच बारावीचा जाहीर होणार असून पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी विद्यार्थ्यांना सेतू सुविधा केंद्र बंद असल्याने ई सेवा केंद्रावरून कागदपत्रे काढावी लागत आहेत.



पालकमंत्र्यांची भेट घेणार
विद्यार्थ्यांना व नागरीकांना इतर कामांसाठी वेळेत वय, राष्ट्रीयत्व व डोमिसाइल प्रमाणपत्र, वय राष्ट्रीयत्व व डोमिसाइल विथ अफेडेविथ, अल्पभूधारक प्रमाणपत्र, भूमिहीन प्रमाणपत्र, जातीचा दाखला, शेतकरी असल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, मायग्रंट कास्ट प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर विथ ऍफेडेविथ, नॉन-क्रिमिलेअर रिनिव्हल प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, विशेष सहाय्यकारी योजनांचे प्रमाणपत्र, ऐपत प्रमाणपत्र आदी मिळणे आवश्यक आहे या विषया संदर्भात जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचीही भेट घेणार आहे, असे निलेश कोलते म्हणाले.

