शिष्याची आदर्श वागणूक हीच खरी गुरूपूजा
सतपंथ संस्थानचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज
फैजपूर : गुरुभक्ती करतांना कोणत्याही गोष्टीची औपचारीकता नको. गुरू-शिष्याच्या नात्यात केवळ फुल, हार, दक्षिणा या बाबींची आवश्यकता नसून गुरु तत्वाचे पालन आचरण करणे हीच खरी गुरूपूजा असते, असे आशीर्वचन येथील सतपंथ संस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. राम रायाला आपल्या झोपडीपर्यंत खेचून आणण्यासाठी शबरी भिल्लीनची भक्ती, श्रद्धा, विश्वास याच बाबी कारणीभूत ठरल्या. तिच्याजवळ फुल, हार, दक्षिणा या कोणत्याही गोष्टी नव्हत्या. अशीच आपली गुरु विषयी श्रद्धा व वागणूक पाहिजे. मी माझे गुरु जगन्नाथ महाराजांशी अशाच प्रकारे वागलो आणि त्यांचा आशीर्वाद म्हणून आज हे वैभव आपल्याला बघावयास मिळत आहे.
गुरूंना आवडेल अशीच करावी भक्ती
गुरूंना दुःख होईल असे न वागता आपण सर्वांनी त्यांना आवडेल, अशीच असीम भक्ती करावी व आपले जीवन धन्य करावे, असे गुरुपौर्णिमेनिमित्त महाराजांनी सांगितले. कोरोना काळ असल्याने शासनाच्या नियमाचे पालन करून सकाळी येथील सतपंथ मंदिरात घटपूजा झाली आणि गुरु पादुका पूजन करण्यात आले. त्यानंतर संजीव किसन महाजन यांनी सपत्नीक महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराजांचे पाद्यपूजन केले.
गुरुपौर्णिमेनिमित्त 21 व 22 जुलै रोजी सायंकाळी आठ ते नऊ यादरम्यान ‘भाव सत्संग’ हा ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला साधारण आठ ते दहा हजार भक्तगण जगभरातून लाईव्ह सहभागी झाले.



