सावद्यातील बायोडिझेल पंप केला सील
सावदा : बायोडिझेल पंप सुरू करण्यासाठी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने लागू केलेले ना हरकत दाखले, प्रमाणपत्र मुदतीत सादर न करू शकल्याने रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या आदेशानुसार फैजपूर रोडवरील डायमंड ट्रान्सपोर्ट मागील झुलेलाल बायोडिझेल पंप सील करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. रावेर पुरवठा निरीक्षक व मंडळ अधिकारी, सावदा यांनी शुक्रवार, 23 जुलै 2021 रोजी रावेर तहसीलदार यांना झुलेलाल बायोडिझेल पंप तपासून तपासणी अहवाल सादर केला होता. या तपासणीत बायोडिझेल साठवणूक विक्रीसाठी विविध विभागांकडून आवश्यक नाहरकत दाखला, प्रमाणपत्रे पंप चालकाने सादर केल्या नसल्याचे नमूद करण्यात आले होते. यानुसार पंप चालकाला हे सर्व 11 कागदपत्रे सोमवार, 26 जुलै रोजी रावेर तहसीलदारांसमोर सादर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली मात्र पंप चालक कागदपत्र सादर करू न शकल्याने झुलेलाल बायोडिझेल पंप अवैधरीत्या सुरु असल्याचे तहसीलदारांच्या निदर्शनास आल्यानंतर तहसीलदारांनी रावेर पुरवठा निरीक्षक रावेर व सावदा मंडळ अधिकारी यांना निरज खेमचंद जसवाणी यांच्या पंपास तत्काळ सील लावण्यात आदेश दिले. सील उघडून डिझेलची विक्री होतांना आढळल्यास गुन्हा दाखल करण्याचेही आदेशात नमूद आहे.




