रावेरच्या बँकांवर तत्काळ गुन्हे दाखल करा : जिल्हाधिकारी


रावेर : पीक विम्याची रक्कम न देणार्‍या बँकांवर गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश असतांना तालुका कृषी अधिकारी मयूर भामरे गुन्हे दाखल करण्यात विलंब करून निष्काळजीपणा करत आहे. या संदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना पत्र देऊन रावेरच्या बँकांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे की, पीक विम्याची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा न करणार्‍या बँकावर गुन्हे दाखल करण्याचे तालुका कृषी अधिकारी सचिव तक्रार निवारण समिती यांना कळवूनदेखील कोणत्याही प्रकारची दखल कार्यवाही केलेली नाही.

हा तर कृषी विभागाशी निगडीत विषय
शासन निर्णय 12 जुले 2019 प्रमाणे तालुका तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव म्हणून तालुका कृषी अधिकारी यांना नियुक्त करण्यात आलेले आहे. हा विषय पूर्णपणे जिल्हा कृषी विभागाशी संबंधित असून पीक विम्याची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा न करणार्‍या बँकावर कारवाई करण्याबाबतची जबाबदारी सदस्य सचिव, तालुका तक्रार निवारण समिती तथा तालुका कृषी अधिकारी यांची आहे. याबाबत वारंवार मुदतवाढ देऊनही बँकांमार्फत शेतकर्‍यांच्या खात्यावर अनुदान वितरणाबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने अशा सर्व संबंधित बँकांवर नियमोचित कार्यवाही करण्याची जबाबदारी तालुका कृषी अधिकारी यांचीच आहे. ही बाब जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी. या प्रकरणी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सर्व संबंधित तालुका कृषी अधिकारी यांना आपले स्तरावरुन निर्देश देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !