जळगाव आर्थिक गुन्हे शाखेच्या पत्रानंतर विमा न देणार्या बँका वठणीवर
शेतकर्यांना विम्याच्या रक्कमेचा परताव्याला सुरूवात
रावेर : सन 2019-20 या वर्षात फळ पीक काढलेल्या शेतकर्यांना ते पात्र असूनही त्यांना नुकसान भरपाईची विम्याची रक्कम देण्यात जिल्ह्यातील 9 बँका टाळाटाळ करीत होत्या मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी या बँकांवर कारवाई करण्याबाबत आर्थिक गुन्हे शाखेला आदेश देताच या बँका नरमल्या आहेत. पोलीस विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पत्रानंतर या बँकांचे अधिकारी वठणीवर आले आहेत. बँकांनी शेतकर्यांच्या विम्याच्या रक्कमांचा परतावा करण्यास सुरुवात केली आहे.
2019-20 या वर्षातील फळ पीक विम्याची रक्कम पात्र लाभार्थी शेतकर्यांना बँका देण्यात टाळाटाळ करीत होत्या. अखेर यात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शेतकर्यांना विम्याची रक्कम न देणार्या बँकांवर गुन्हे दाखल करण्याचे पत्र पोलीस अधीक्षकांना दिले होते. त्यानुसार अधीक्षक डॉ.मुंढे यांनी आर्थिक गुन्हे शाखेला पत्र देऊन चौकशी व कारवाई करण्याचा आदेश दिला. या पत्रानुसार आर्थिक गुन्हे शाखेतर्फे विमा न देणार्या बँकांना 26 जुलैला समजपत्र देऊन आपल्या विरुद्ध भादंवि कलाम 188 प्रमाणे फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये ? असे पत्र बजावण्यात आले शिवाय याबाबत तत्काळ खुलासा न केल्यास आपले काही म्हणणे नाही असे गृहीत धरून फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा देताच शेतकर्यांना फळ पीक विम्याचे पैसे मिळण्यास सुरूवात झाली आहे.




