झिंगाट चोरट्यांचा बिअरसह दारूवर डल्ला
सावदा : शहरातील हॉटेल मनाली परमीट रूम व बिअरबारमधून चोरट्यांनी चक्क दारूसह बियरचे बॉक्सेस आणि बाटल्या लांबवल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. सावदा येथे महामार्गाला लागूनच हॉटेल मनाली परमीटरूम आणि बिअरबार आहे. या हॉटेलच्या उत्तरेच्या बाजूस असणार्या खिडकीला तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करीत हॉटेलमध्ये असणारे दारू आणि बियरचे संपूर्ण बॉक्सेस आणि बाटल्या लांबवल्या. शनिवारी पहाटे चोरीचा प्रकार उघडकीस आला. सावदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सुमारे 50 हजारांपर्यंत मद्यसाठा लांबवल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.




