अनधिकृत बायोडिझेल विक्री कुणाच्या आशीर्वादाने ?


आमदार चंद्रकांत पाटील यांचा सवाल : रावेर तहसीलदारांच्या भूमिकेविषयी प्रांताकडे नाराजी

फैजपूर : सावदा हद्दीतील असलेल्या बायोडिझेल विक्री कोणाच्या आशीर्वादाने सुरू होती ? बायोडिझेलचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसतानाही ही विक्री झाली कशी शिवाय याबाबत तहसीलदारांनी वेळीच का दखल घेतली नाही? असा प्रश्‍न उपस्थित करीत आमदार चंद्रकांत पाटील यांनी रावेर तहसीलदारांच्या कार्यपद्धत्तीवरही उघड नाराजी फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांची भेट घेत व्यक्त केली.

तहसीलदारांच्या कार्यपद्धत्तीवर नाराजी
अनधिकृतरीत्या बायोडिझेल विक्री प्रकरणी कुणी अधिकारी दोषी असल्यास त्यांची मी स्वतः तक्रार करणार असल्याचे आमदारांनी सांगत बायोडिझेल विक्रीसाठी कोठून उपलब्ध होते ? याबाबत महसूल अधिकारी यांनी याचा तपास केला का? तसेच पोलीस प्रशासन यांना कारवाईसाठी पत्र अथवा गुन्हा का दाखल केला नाही ? याची विचारणा करणार असल्याचे त्यांनी सांगत रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. बुधवारी एक वाजता प्रांताधिकारी कार्यलयात आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रांताधिकारी कैलास कडलग यांची भेट घेतली व बायोडिझेल विक्रीची कोणतीही परवानगी नसताना सावदा विभागात बिनधास्तपणे बायोडिझेल विक्री कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे ? यात मागील एका आठवड्यात केवळ सावदा हद्दीतील बायोडिझेल पंप सील करण्याची कारवाई रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी कारवाई केली मात्र पोलिसात फिर्याद देण्यात आली नाही शिवाय बायोडिझेल पंपाचे सॅम्पल घेऊन तपासणीसाठी का पाठवले नाही? असा प्रश्‍न उपस्थित करीत महसूल अधिकारी यांच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित करीत यात काही आर्थिक चिरीमिरी तर नाही ना ? असा थेट सवाल आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. यावेळी प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले व वस्तूनिष्ठ अहवाल मागवून योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, शिवसेना शहराध्यक्ष तथा नगरसेवक अमोल निंबाळे, शेख शाकिर शेख इमाम, शिवसेना उपतालुका प्रमुख राजू काठोके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !