भुसावळकरांना खड्डेमय रस्त्यांमधून मुक्ती कधी ?
संतप्त नागरीकांचा सवाल : पालिका निवडणुकीत भुसावळकर दाखवणार जागा
भुसावळ : नाशिक विभागात एकमेव ‘अ’ वर्ग पालिका व वार्षिक सरासरी दोनशे कोटींचा बजेट असतानाही शहरातील वर्दळीच्या रस्ते मात्र घाव सोसत असल्याने आश्चर्य व तितकाच संताप व्यक्त होत आहे. खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करताना शहरवासीयांची हाडे खिळखिळी झाली आहेत तर वाहन दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. सत्ताधार्यांना ही परीस्थिती मात्र दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शहरातील प्रमुख वर्दळीच्या या रस्त्यांचे रूप पालटणार कधी ? हा प्रश्न भुसावळकर विचारत आहे. वेळीच रस्त्यांचा तिढा सुटला नाही तर आगामी निवडणूक मतदार लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत व हे सांगण्यासाठी ज्योतीषाची देखील गरज नाही. पालिकेत विरोधक नावालाच उरले असून त्यांच्या आलबेल भूमिकेने आश्चर्य व्यक्त होत आहे.
स्टेशन रस्ता कात टाकणार कधी ?
रेल्वेच्या जंक्शन स्थानकाला जोडणारा केवळ अर्धा किलोमिटर अंतराचा रस्ता अखेरची घटका मोजत आहे. कोट्यवधींचा बजेट असलेल्या रेल्वे विभागाने आपल्या हद्दीतील रस्ते चकाचक केले मात्र हा रस्ता गेल्या दीड वर्षांपासून रखडला आहे. डीआरयुसीसीच्या बैठकीत या रस्त्याच्या प्रश्नी रेल्वे प्रशासनाने या रस्त्यावरुन रेल्वेच्या प्रवाशांपेक्षा शहरातील नागरीकच अधिक वापरतात, यामुळे नगरपालिकेने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव दिल्यानंतर कारवाई करणार, असे अजब उत्तर दिले आहे.



गांधी पुतळा ते लोखंडी पूल रस्त्यावरही यातनाच
यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा ते लोखंडी पुलापर्यंतच्या रस्त्याचीदेखील वेगळी गत नाही. हजारो वाहन धारकांचा या रस्त्यावरून वापर आहे मात्र शहर पोलीस ठाण्याजवळच या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने मध्यंतरी पोलीस प्रशासनानेच स्वखर्चाने खड्डे बुजवत पालिका व प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घातले मात्र त्यानंतरही दखल घेण्यात आली नाही. पावसामुळे रस्त्याची जैसे थे स्थिती आहे आहे. धड पायी चालता येणार नाही इतकी विदारक स्थिती निर्माण झाली असताना वाहनधारकांसह शहरवासी प्रचंड संतप्त झाले आहेत.
या रस्त्यांचे नशीब उजळणार का ?
शहरातील जामनेर रोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते रजा टॉवर व रजा टॉवर ते खडका चौफुलीला जोडणारा रस्ता तसेच लोणारी हॉल ते कोनार्क हॉस्पीटलपर्यंतच्या रस्त्यांची जीवघेणी अवस्था झाली आहे. रस्त्यावरून पायी चालणेही कठीण होत आहे. अवघ्या काही महिन्यांनी पालिका निवडणुका होवू घातल्या आहेत. गेल्या पाच वषार्र्त रस्त्यांचे नशीब उजळले नाही मा वेळ अजून गेली नसल्याने सत्ताधार्यांनी या बाबीकडे गांभीर्याने पाहण्याची आशा व्यक्त होत आहे.
वाहनधारकांना जडले आजार
शहरातील प्रमुख स्टेशनरोड, जामनेर रोड, गांधी पुतळ्याकडून बाजारपेठ पोलीस ठाण्याकडे येणारा रस्ता खिळखिळा झाला आहे. प्रवाशांसोबत रिक्षाचालक, वाहनधारक, महिला, बसचे चालक व वाहक आदींना या खड्डेमय रस्त्यामुळे मानपाठ दुखीचा त्रास जडला आहे. तर या मार्गावरुन प्रवासी रीक्षांचेही प्रमाण अधिक आहे. यामुळे रीक्षा चालकांसह दुचाकींचा मेंटेनन्स खर्चही वाढला आहे.

