कुर्हेपानाचेत भरदिवसा घरफोडी : दोन आरोपी जाळ्यात
भुसावळ : तालुक्यातील कुर्हेपानाचे येथे मंगळवारी भर दिवसा चोरटयांनी बंद घरातून अडीच ग्रॅम वजनाचे दागिने लांबवले होते. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरट्यांनी चोरीनंतर हे दागिने मोडण्यासाठी सराफाचे दुकान गाठले मात्र सराफाने पावतीविना दागिने घेण्यास नकार दिल्याने चोरटे आल्या पावली माघारी परतले मात्र खबर्यापर्यंत ही बातमी पोहोचताच त्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर चोरटे तालुका पोलिसांच्या जाळ्यात अडकले. वैभव संजय बावस्कर (22) व महेश गोपाल वराडे (22, कुर्हेपानाचे) अशी अटकेतील आरोपींची नावे असून एका अल्पवयीन बालकासही या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. चोरट्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची (13 पर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
भर दिवसा झाली होती चोरी
कुर्हेपानाचे येथील पुंडलिक संपत सपकाळे (59) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी 10 रोजी सकाळी 10.30 ते 11.30 वाजेदरम्यान 12 हजार 500 रुपये किंमतीचे अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल लांबवले होते. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, तालुका पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करीत दोघा आरोपींकडून अडीच ग्रॅम वजनाचे टोंगल जप्त केले.



