उपसा सिंचन योजनांचा आढावा घेऊन निधी द्यावा
जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे खेवलकर यांची जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे मागणी
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील बोदवड परीसर उपसा सिंचन योजना, कुर्हा-वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजना या अपूर्ण अवस्थेत असलेल्या उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी नुकतीच राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांची मुंबई येथे भेट घेत केली.
निधीअभावी योजनेची कामे संथ
याबाबत जलसंपदा मंत्र्यांना माहिती देताना अॅड.रोहिणी खडसे यांनी सांगितले की, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी तापी खोरे विकास महामंडळ स्थापन केले. या महामंडळांतर्गत पूर्णा तापी नदीचे वाहून जाणारे पाणी मुक्ताईनगर बोदवड कुर्हा परीसरातील शेतीचे कोरडवाहू क्षेत्र बागायती खाली येण्यासाठी लिफ्ट इरीगेशनद्वारे उपसुन शेतीला देण्यासाठी या महामंडळाच्या अंतर्गत बोदवड उपसा सिंचन योजना, कुर्हा-वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजना या योजनांची मुहूर्तमेढ रोवली गेली. या योजनांचे काम सुरू आहे परंतु या उपसा सिंचन योजनांचे काम पूर्णत्वास जाऊन मुक्ताईनगर, बोदवड परीसर सुजलाम सुफलाम होण्यासाठी योजनांना भरीव निधीची आवश्यकता आहे. यातील मुक्ताई उपसा सिंचन योजनेचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. बोदवड उपसा सिंचन योजना, कुर्हा-वढोदा इस्लामपूर सिंचन योजनेचे काम निधी अभावी संथ गतीने सुरू आहे.



पुढील आठवड्यात बैठक घेण्याची ग्वाही
या उपसा सिंचन योजना पूर्णत्वास जाणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी निधीची उपलब्धता व्हावी तरी बोदवड परीसर उपसा सिंचन योजना, कुर्हा वढोदा इस्लामपुर उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजना या अपुर्ण अवस्थेत असलेल्या उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. यावर जलसंपदा मंत्री नामदार जयंतराव पाटील यांनी पुढील आठवड्यात उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेण्यात येईल व निधीची उपलब्धता करून देण्यात येईल असे आश्वासन दिले.
यांची होती उपस्थिती
यावेळी अॅड.रोहिणी खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, रावेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील उपस्थित होते.

