भुसावळात कत्तलीच्या इराद्याने गुरांची वाहतूक : आठ गुरांची सुटका : दोघांना अटक
भुसावळ : सावद्याकडून औरंगाबादकडे गुरांची निर्दयतेने व कत्तलीच्या इराद्याने वाहतूक होत असताना पोलिसांनी ट्रक पकडत आठ गुरांची सुटका केली. या प्रकरणी दोघांविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीताना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
नाकाबंदीदरम्यान पोलिसांची कारवाई
मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास शहर पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान गांधी पुतळ्याजवळ ट्रक (एम.एच.04 डी.डी.5176) थांबवल्यानंतर त्याची झटती घेतली असता त्यात गुरांची निर्दयतेने वाहतूक होत असल्याचे दिसून आले. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे व निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय पाटील, सोपान पाटील, जाकीर शेख व विकास बाविस्कर यांनी ट्रक ताब्यात घेत शहर पोलिस ठाण्यात आणला. ट्रक चालक शेख रफिक शेख उस्मान व शेख मुस्ताक शेख सत्तार या दोन्ही जणांविरूध्द पोलिस कर्मचारी विकास बाविस्कर यांनी फिर्याद दिल्यावरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ट्रकमधील गुरांची जळगावच्या आरसी बाफना गोशाळेत रवाना करण्यात आली.



