लाचखोर महिला लिपिक एसीबीच्या जाळ्यात
पुणे : जिल्हा परीषद अंतर्गत एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्पात मुळशी तालुक्यातील पौड येथे कार्यरत कनिष्ठ लिपिक सीमा विद्याधर विपट (47) यांना तीन हजार 450 रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली. आपल्या विभागातील कर्मचार्याचे बिल मंजूर करण्यासाठी टक्केवारीप्रमाणे मोबदला म्हणून विपट यांनी लाच मागितली. तक्रारदार हे त्यांच्याच विभागात कर्मचारी आहेत. त्यांचा प्रवास भत्ता बील मंजूर केल्याचा मोबदला म्हणून विपट यांनी तक्रारदार त्यांच्याकडे 3 हजार 450 रुपयांची लाच मागितली. या कर्मचार्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणी केल्यावर विपट यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पौड येथील कार्यालयात सापळा रचण्यात आला. 3 हजार 450 रुपयांची लाच स्वीकारताना सीमा विपट यांना पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर तपास करीत आहेत.
