वराडसीम-बेलव्हाळ शिवारात निलगायीचा मृत्यू
अज्ञात वाहनाची धडक लागल्याची शक्यता
भुसावळ : तालुक्यातील बेलव्हाळ गावाजवळ रस्त्याच्या खोल चारीत निलगाय मृतावस्थेत आढळल्यानंतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी पंचनामा करून मृत निलगायीची विल्हेवाट लावली. अज्ञात वाहनाच्या धडकेने निलगायीचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. बेलव्हाळपासून काही अंतरावर असलेल्या वराडसीम रस्त्यावर श्री सप्तशृंगी देवीच्या मंदिरा जवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत गुरुवारी निलगाय मृतावस्थेत असल्याची माहिती या शिवारात गेलेल्या नागरीकांनी बेलव्हाळ पोलीस पाटील योगेश नेहते यांना कळवल्यानंतर त्यांनी पाहणी केली. त्यानंतर कुर्हा पानाचे येथील वनविभागाच्या अधिकार्यांना फोनवर माहिती दिली. प्रसंगी वनविभागाचे कर्मचारी जाधव, पोलीस पाटील योगेश नेहते, सामाजिक कार्यकर्ते किरण शिंदे, सर्पमित्र अजय खरोटे , आकाश सोनवणे, विशाल कोळी यांनी मृत निलगीय कुर्हेपानाचे वनविभागाच्या कार्यालयात आणल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.येवले यांनी शवविच्छेदन केल्यानंतर निलगायीची शासकीय नियमानुसार विल्हेवाट लावली.




