30 हजारांचा किराणा घेवून संशयीताची धूम : पोलिसांनी पाठलागानंतर कार केली जप्त


यावल शहरातील धक्कादायक घटना : भुसावळ चारचाकी सोडून संशयीत मात्र पसार

यावल : 30 हजारांचा किराणा दुकानदाराकडून घेतल्यानंतर संशयीताने बिल न देताच वाहनासह धूम ठोकली मात्र यावल व भुसावळ पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी पाठलाग करून कारचा भुसावळपर्यंत थेट पाठलाग केल्यानंतर संशयीताने भुसावळातील तापी नगरात चारचाकी सोडून धूम ठोकली. पोलिसांनी चारचाकी ताब्यात घेतली आहे. पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.

किराणा माल भरत चालकाची धूम
शहरातील बुरूज चौकात मालक नाजीम खान यांचे खान्देश प्रोव्हिजन किराणा दुकान आहे. गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास दुकानावर खान बसले असताना चारचाकी (एम. एच. 04 ई. क्यू. 1227) मधून आलेल्या एकाने 29 हजार 600 रुपयांचा किराणा सामान खरेदी केला व सर्व सामान कारमध्ये ठेवतो, तुम्ही बिल तयार करा, असे त्याने दुकान मालकाला सांगितले मात्र सर्व सामान चारचाकीत ठेवल्यानंतर संशयीताने बिल न देता धूम ठोकली. या प्रकारानंतर दुकानदाराने यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना माहिती कळवताच सहा.पोलीस निरीक्षक अजमल खान पठाण, वाहन चालक रोहिल गणेश, गणेश ढाकणे, अशोक बाविस्कर यांनी चारचाकीचा पाठलाग केला तर वाहन भुसावळच्या दिशेने गेल्याचे समजताच भुसावळ शहर वाहतूक व शहर पोलीस ठाण्याला माहिती कळवण्यात आली.




भुसावळात चारचाकी सोडून संशयीत पसार
भुसावळ शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंतराव गायकवाड, सुनील शिंदे, चंद्रशेखर गाडगीळ, संजय बडगुजर, संजय सोनवणे, संदीप राजपूत, विशाल मोहे आदींच्या पथकानेदेखील यावल पोलिसांच्या मदतीसाठी धाव घेत यावल रोडवरील बल्लूभाई यांच्या गॅरेजजवळ चारचाकीला अडवण्याचा प्रयत्न केला. पोलीस अगदी जवळ येत असल्याचे पाहताच संशयीताने चारचाकी सोडून पोबारा केला. यावल पोलिसांनी किराणा मालसह चारचाकी ताब्यात घेतली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !