संच निर्धारण प्रक्रियेतील सावळा-गोंधळ संपुष्टात आणा
विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे रक्षण करा : महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेची मागणी
शिंदी : संच निर्धारण प्रक्रियेतील सावळा-गोंधळ संपुष्टात आणून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे रक्षण करा, अशा मागणीचे निवेदन शिक्षक परीषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण संचालक द.गो.जगताप यांना पाठवण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषद जिल्हा जळगावच्या वतीने देण्यात आली.
त्रृटी बाबतचे प्रस्ताव संचालक कार्यालयात प्रलंबित
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांचे प्रत्येक शैक्षणिक वर्ष संच निर्धारण करण्याचे कायदेशीर अधिकार जिल्हा शिक्षणाधिकारी यांना आहे. शैक्षणिक सत्र सन 2013-14 पासून शासनाने कायद्यात नियमात बदल न करता संच निर्धारणची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केंद्रीय स्तरावर सुरू केली आहे. या प्रक्रियेद्वारे संच निर्धारणाचे आदेश तयार करून जिल्हा शिक्षण अधिका्र्यांना पाठविण्यात येते. जिल्हा शिक्षणाधिकारी संच निर्धारणाच्या आदेशावर स्वाक्षरी करून आदेशाची प्रत शाळेला वितरीत करतात. या संच निर्धारणात असलेल्या त्रृटी दूर करण्याची जबाबदारी जिल्हा शिक्षणाधिकारी पार पाडू शकत नाही. त्यामुळे शैक्षणिक 2013-14 पासून संच निर्धारण यातील त्रृटी बाबतचे प्रस्ताव संचालक कार्यालयात प्रलंबित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.



पैशांची मागणी होत असल्याचा आरोप
संच निर्धारणातील त्रृटी बाबतचे प्रस्ताव निकाली काढण्याकरीता राज्यातील शेकडो मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी शिक्षण संचालक कार्यालयात चकरा मारत असतात. त्यांना शिक्षण संचालक कार्यालयात आवश्यक ती माहिती मिळत नाही. उलट दलालांमार्फत त्यांना पैशांची मागणी करण्यात येते. पैसे न दिल्यास प्रस्ताव जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात येतो किंवा असंबंधित त्रृट्या निदर्शित करून प्रस्ताव परत करण्यात येत असतो. हा सावळा-गोंधळ शैक्षणिक क्षेत्रात 2013-14 पासून सातत्याने मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शासनाच्या व प्रशासनाच्या नियमबाह्य कृतीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. संच निर्धारण दुरुस्तीबाबत आजपर्यंत नऊ वेळा शिबिर घेण्यात आले परंतु ही समस्या निकाली काढण्यात आली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सावळा-गोंधळ संपुष्ठात आणण्याची मागणी
संच निर्धारण प्रक्रियेतील सावळा-गोंधळ संपुष्ठात आणण्याची मागणी शिक्षक परीषदेतर्फे करण्यात आली आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक परीषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार, राज्य महिला आघाडी प्रमुख पुजा चौधरी, नरेंद्र वातकर, किरण भावठाणकर, माजी अध्यक्ष बाबासाहेब काळे, माजी आमदार भगवान अप्पा साळुंके, संजीवनीताई रायकर, मुंबई विभाग अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, नाशिक विभाग अध्यक्ष सुनील पंडित, दिलीप अहिरे, बाबासाहेब बोडके आदी प्रयत्नशील असल्याची माहिती जळगाव जिल्हा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा नेते एस.एस.अहिरे, जिल्हा प्र.अध्यक्ष गिरीश एस.नेमाडे, सुभाष मराठे, पी.आर.घोगरे, अश्विन कुमार इंगळे यांनी दिली.

