अवघ्या एक हजार रुपयांसाठी भावाचा केला खून !
लातूर : अवघ्या एक हजार रुपयांसाठी भावाचाच खून करण्यात आल्याची घटना कासारजवळा येथे घडली. या घटनेत वैजनाथ आश्रुबा सुडके (30, रा.कासार जवळा, ता.लातूर) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गातेगाव पोलिसांनी नागनाथ सुडके (28) यास अटक केली असून त्यास न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
एक हजारांसाठी घेतले भावाचे प्राण
लातूर तालुक्यातील कासार जवळा येथील वैजनाथ आश्रुबा सुडके आणि नागनाथ आश्रुबा सुडके हे दोघे सख्खे भाऊ आहे. धानमंत्री किसान योजनेचे दोन हजार रुपये खात्यावर वैजनाथ यांच्या खात्यावर जमा झाले होते. यातील एक हजार रुपये मला द्यावेत म्हणून नागनाथने वैजनाथकडे तगादा लावला. नागनाथ हा व्यसनी असल्याने वैजनाथने दोन हजारातील एक हजार रुपये नागनाथ यांच्या पत्नीकडे दिले. हे एक हजार मला न देता माझ्या पत्नीकडे कशासाठी दिले म्हणून नागनाथ सुडकेने 24 ऑगस्टरोजी रात्री 8.30 वाजता भांडायला सुरुवात केली. भांडणात वैजनाथ यांच्या डोक्यात नागनाथने काठी घातली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वैजनाथला कुटुंबीयांनी लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, बुधवारी 25 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत गातेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील आरोपी नागनाथ सुडके याला ताडकी मार्गावरुन अंबाजोगाईकडे पायी जात असताना पोलिसांनी अटक केली. तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर कांबळे करीत आहेत.
