30 हजारांची लाच भोवली : महावितरणच्या अभियंत्यांसह पंटर एसीबीच्या जाळ्यात
औरंगाबाद : महावितरणच्या जालना येथील उपविभागीय कार्यालयातील अतिरीक्त कार्यकारी अभियंत्यासह त्याच्या पंटरला औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ अटक केल्याने महावितरणच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली. कार्यकारी अभियंता रेवानंद लक्ष्मण मोरे आणि खासगी पंटर दीपक रतन नाडे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. वीज बिलाची रक्कम कमी करण्यासाठी कंत्राटदाराकडून 30 हजार रुपये लाच घेताना ही कारवाई करण्यात आली.
लाच प्रकरण अंगलट
तक्रारदार हे सोलर पॅनल बसवून देण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीला जास्त बिल आले होते. या बिलाची रक्कम कमी करण्यासाठी त्यांनी कार्यकारी अभियंता मोरे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या औरंगाबाद परिक्षेत्राचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्याकडे तक्रार केली. ठरल्याप्रमाणे मंगळवारी सकाळी एसीबीच्या अधिकारी, कर्मचारी यांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. तक्रारदार यांना लाचेची रक्कम घेऊन मोरे यांच्याकडे पाठविले. मोरे यांनी लाचेची रक्कम त्यांचा पंटर खासगी वाहनचालक दीपक नाडे याच्याकडे देण्यास सांगितले. मोरे यांच्या सांगण्यावरून नाडेने तक्रारदार यांच्याकडून लाचेचे 30 हजार रुपये घेताच दबा धरून बसलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी त्यास रंगेहाथत पकडले. यानंतर मोरे यासही ताब्यात घेतले. याप्रकरणी जालना येथील कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.




