धक्कादायक : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना छोटा राजन टोळीकडून धमकीचा फोन


नाशिक : नांदगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना थेट छोटा राजन टोळीकडून धमकीचा फोन आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या संदर्भात कांदे यांनी या प्रकरणी पोलीस आयुक्तालयाकडे मंगळवारी दुपारी तक्रार अर्ज दिला आहे. नांदगाव मतदार संघासाठी जिल्हा नियोजन समितीकडून आलेल्या निधीचे सम-समान वाटप न केल्याचा आरोप करत कांदे यांनी गेल्या 5 सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत रीट पीटीशन दाखल केली तसेच या याचिकेत सामनेवाले असलेले पालकमंत्री भुजबळ यांच्याविरुध्द पुरावेही दाखल केल्याचा कांदे यांनी तक्रार अर्जात केला आहे.

रीट पीटीशन मागे घेण्यासाठी चक्क धमकी
सोमवार, 27 रोजी कांदे हे गंगापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदवली येथील त्यांच्या घरी असताना संध्याकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर संशयित अक्षय निकाळजे नावाच्या व्यक्तीने फोन केला. यावेळी त्याने ‘मी अक्षय निकाळजे बोलत आहे, मी छोटा राजनचा पुतण्या असून तुम्ही उच्च न्यायालयात जे रीट पीटीशन दाखल केलेले आहे, ते कोर्टातून काढून घ्या अन्यथा तुमच्यासाठी व कुटुंबियांसाठी चांगले होणार नाही…’ अशी धमकी दिल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. यानंतर कांदे यांनी हा फोन कट केला आणि पुन्हा संध्याकाळी सात वाजता त्या क्रमांकावर फोन केला असता कुठलाही प्रतिसाद मिळू शकला नसल्याचे त्यांनी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याकडे केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. दरम्यान, कांदे यांच्या तक्रार अर्जानंतर पोलीस आयुक्तालयाकडून काय पावले उचलली जातात याकडे लक्ष लागले आहे.







 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !