भाजपाच्या आंदोलनानंतर नागेश्वर महादेव मंदिर रेल्वे पुलाखालील पाणीप्रश्न मार्गी
माजी नगराध्यक्ष सुनील काळेंच्या आंदोलनानंतर सा.बां.विभागाकडून तातडीने कामाला सुरूवात
वरणगाव : तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराजवळील रेल्वे पुलाखाली पाणी साचल्यामुळे वाहनधारकांसह पादचार्यांना पायी चालणेदेखील कठीण ठरत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करून दखल घेतली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत होती. नागरीक व वाहनधारकांना होणारा त्रास लक्षात घेत वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी 11 वाजता पुलाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाला आंदोलनाची माहिती कळताच अधिकार्यांनी दखल घेवून जेसीबीद्वारे कामाला सुरूवात केली व आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तातडीने काम पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
आंदोलनानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग
भाजपाच्या वतीने शुक्रवारी सकाळी 11 वाजता रेल्वे पुलाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपाचे शहराध्यक्ष सुनील माळी, उपाध्यक्ष हितेश चौधरी, कामगार नेते मिलिंद मेढे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, प्रताप दिव्यवीर, भाजयुमोचे सरचिटणीस आकाश निमकर, विशाल कुंभार, कमलाकर मराठे, जिल्हा सरचिटणीस डॉ.सादीक, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, सरचिटणीस गोलू राणे, नटराज चौधरी, राहुल जंजाळे आदी आंदोलनात सहभागी झाले. जो पर्यंत अधिकारी येवून कामाला सुरूवात करीत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, अशी भूमिका माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी घेतल्याने खळबळ उडाली.



तत्काळ कामाला सुरूवात झाल्याने आंदोलन मागे
आंदोलनस्थळी तत्काळ बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता पियूष ठाकूर, बी.व्ही.कांबळे व सहकार्यांनी धाव घेतली. आंदोलनकर्ते माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्याशी चर्चा करण्यात आली. तत्काळ कामाला सुरूवात करण्यात येईल मात्र आंदोलन तत्काळ मागे घ्या, अशी विनंती केल्यानंतर आधी काम सुरू करा नंतर आंदोलन मागे घेवू, अशी भूमिका काळे यांनी मांडल्यानंतर तत्काळ जेसीबी मागून कामाला सुरूवात करण्यात आल्यानंतर पुलाखाली साचलेल्या पाण्याचा निचरा झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले शिवाय उर्वरीत कामही लवकरच करण्यात येणार असल्याचे आश्वासन अधिकार्यांनी यावेळी दिले. अपूर्ण काम पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिला.
महाविकास आघाडीविरोधात घोषणाबाजी
आंदोलनकांनी यावेळी वरणगाव रेल्वे स्टेशन ते बस स्टँड रस्ता खराब झाल्याने तो नव्याने करण्यात यावा अन्यथा ठेकेदाराला ब्लॅक लिस्टेट करण्यावे तसेच नागेश्वर रस्त्यावर जे खड्डे पडले आहेत तत्काळ बुजावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद आदी घोषणांनी परीसर दणाणला.
न्हावी शिवारात गुरे चराईसाठी गेलेल्या प्रौढाचा वीज कोसळल्याने मृत्यू
