गडकरी म्हणाले ; दोन तासात नाशिकहून मुंबई प्रवास शक्य


नाशिक : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिककरांना आश्‍वासन देत घोषणांचा पाऊस पाडला. गडकरींच्या हस्ते राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलासह तब्बल 2048 कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. नाशिकमधल्या मनोहर गार्डन येथे हा भव्यदिव्य सोहळा पार पडला. यावेळी गडकरींनी नाशिककरांना प्रगतीचे नवे स्वप्न दाखवले. ते म्हणाले की, आगामी काळात तुम्ही नाशिक ते मुंबई अवघ्या दोन तासांत पोहचाल. माझं बोलणं टेप करून ठेवा. एकही आश्वासन खोटं होणार नाही. द्वारका ते नाशिकरोड या 1600 कोटी खर्चाच्या डबल डेकर उड्डाणपुलाला मंजुरी दिली. मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देत एका महिन्याच्या आत ही दुरुस्ती होईल, असे आश्वासन दिले.

अवघ्या दोन तासात नाशिककर पोहोचणार मुंबईत
नाशिक-मुंबई महामार्गाच्या सहा पदरीकरणासह सिमेंट रस्त्यासाठीच्या कामाला पाच हजार कोटी रुपयांची मंजुरी दिल्याची घोषणा केली. त्यामुळे येणार्‍या काळात नाशिक-मुंबई अंतर फक्त दोन तासांत कापले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. वरळी-बांद्रा पुढे मला वसईपर्यंत जोडायचं होतं, ते मला त्यावेळी शक्य झालं नाही. मात्र, नरीरमन पॉईंट ते दिल्ली हे अंतर 12 तासांत गाठता आलं पाहिजे, हे काम करायचं असल्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. नाशिक शहराच्या बाजूला लॉजिस्टिकसाठी जागा असेल तर द्या, मी हा विभाग डेव्हलप करतो. महापालिकेने जागा दिल्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वतीने लॉजिस्टिक पार्क उभारू, असे गडकरी म्हणाले.







वातावरण खराब होणार नाही याची काळजी घ्या
गडकरी म्हणाले, शहराचा विकास होत असताना नाशिकचं सुंदर वातावरण खराब होणार नाही, याची जळजी घ्या. शहरातले ट्रॅक टर्मिनल, कोल्ड स्टोरेज, गोडाऊन, ट्रकचे गॅरेज सर्व काही शहराबाहेर महामार्गावर स्थलांतरित करा. त्यामुळे वाहतुकीची समस्याही सुटेल आणि प्रदूषणही कमी होईल. नाशिकचे शेतकरी खूप मेहनती आहेत. विदर्भातील लोकांनी त्यांच्याकडून काही तरी शिकावे, असे आवाहन त्यांनी केले.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !