‘सिंधुदुर्गाचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलाय : नाहीतर कोणीतरी म्हणेल की तो किल्लाही मीच बांधला -उद्धव ठाकरे
सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळे चांगलीच जुगलबंदी रंगली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या भाषणात कोकणाच्या विकासाचे शिल्पकार आपणच असल्याचा दावा केला होता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही खोचक शैलीत प्रत्युत्तर देताना सिंधुदुर्गाचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे, नाहीतर कोणीतरी म्हणेल की तो किल्लाही मीच बांधला. मुख्यमंत्र्यांच्या या वाक्यानंतर मात्र कार्यक्रमात चांगलीच खळबळ उडाली.
मुख्यमंत्री म्हणाले, कोकणात बाभळी आणि आंब्यांची झाडेही उगवता
मुख्यमंत्री म्हणाले की, कोकणाच्या मातीत बाभळी आणि आंब्याची दोन्ही झाडं उगवतात. त्यामध्ये मातीचा दोष नसतो. त्यामुळे कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. नारायण राणे यांनी व्यासपीठावरून हाणलेल्या जवळपास प्रत्येक टोल्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिटोला लगावला. काही लोक पाठांतर करून बोलतात, पण अनुभवाने बोलणं वेगळं असतं. मनातील मळमळ बोलून दाखवणे हे तर त्यापेक्षाही वेगळं असतं. आज या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. इतका चांगला क्षण असताना त्याला गालबोट लागू नये म्हणून एक काळं तीट असावं लागतं, तशीच काही लोकं आज याठिकाणी आहेत, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.






‘खोटं बोलणार्या लोकांना बाळासाहेबांनीच त्यावेळीच बाहेर काढले होते’
नारायण राणे यांनी आपल्या भाषणात, ‘बाळासाहेबांना खोटं बोलणं कधी आवडलं नाही. खोट्याला त्यांनी थारा दिला नाही’, असे वक्तव्य केले होते. त्यावरुनही उद्धव ठाकरे यांनी राणेंची चांगलीच हजेरी घेतली. नारायणराव, बाळासाहेबांना खोटं बोलणारी लोकं आवडत नाहीत, हे खरंच आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी तेव्हाच अशा लोकांना शिवसेनेतून बाहेर काढले होते, हा सुद्धा इतिहास आहे. कटू असलं तरी चालेल पण खरं बोलं. खोटं बोललेलं मला चालणार नाही. खोटं बोलशील तर गेट आऊट. हे त्यांनी दाखवलंय. असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले. आपण केंद्रात मंत्री आहात. लघू का असेना सुक्ष्म का असेना पण मोठं खातं आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राला नक्की करुन द्याल ही तुमच्याकडून मला अपेक्षा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.


