केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले ; सिंधुदुर्गचा विकास केवळ राणेंमुळेच
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात झालेल्या विकासासाठी राणे कारणीभूत आहेत. दुसर्याचे नाव येऊच शकत नाही, असा निशाणा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पाहून साधला. चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणे यांच्यावर जोरदार टिका केली. तत्पूर्वी राणे यांनीही मुख्यमंत्र्यांसह आदित्य ठाकरेंवर टिका केली.
राणे म्हणाले, विकासाची अपेक्षा
पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा. जिल्ह्यातील व्यावसायिक, उद्योजकांच्या माध्यमातून जिल्ह्यात विकास व्हावा, अशी माझी अपेक्षा आहे. स्वर्गीय बाळासाहेबांनी मला सिंधुदुर्गात पाठवलं. ते म्हणाले तुझी तिकडे गरज आहे. 90 साली जिल्हा फिरलो. फेब्रुवारी महिन्यातही जिल्ह्यात प्यायला पाणी नव्हतं. जिल्ह्यात पुरेसे रस्ते नव्हते. अनेक गावांना वीज नव्हती. 90 सालापर्यंत अंधारात लोक राहायचे. इथली मुलं कितीही शिकली तरी नोकरीसाठी मुंबईला जायची. मुंबईवर अवलंबून असलेल्या या जिल्ह्यात मी आलो. तेव्हा मी ठरवलं की या जिल्ह्याचा विकास करायचा, असं राणे म्हणाले.






‘उद्धवजी हे सर्व मी साहेबांच्या प्रेरणेतून आत्मसात केलं’
उद्धवजी हे सर्व मी साहेबांच्या प्रेरणेतून आत्मसात केलं. त्यात माझा स्वार्थ नव्हता. मी छोटा-मोठा उद्योजकही आहे. सिंधुदुर्गाचा विकास कोणत्या माध्यमातून करता येईल याचा विचार मी केला. तेव्हा विमानतळाचा मुद्दा समोर आला. तेव्हा मी टाटाकडे गेलो. बाजूला गोवा आहे, तुम्हाला समुद्र लाभलाय. पर्यटनाच्या दृष्टीने पोषक जिल्हा आहे. 95 ला युतीची सत्ता आली. मनोहर जोशींना मी सांगितलं की पर्यटन जिल्हा करु. तेव्हा केंद्राकडे परवानगी मागितली आणि देशातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग झाला.
‘जे दिसतंय त्याच्या उभारणीला राणेंचं योगदान’
साहेबांच्या आशीर्वादानं मी मुख्यमंत्री झालो. त्यावेळी गोपीनाथ मुंडे माझे सहकारी होते. जिल्ह्यातील पुलांच्या कामासाठी 120 कोटी, पाण्यासाठी 118 कोटी दिले. आज जे इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय त्याचा उभारणीला राणेंचं योगदान आहे. दुसरा कुणी इथे येऊच शकत नाही.


