मंदाताई खडसेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला तर खडसेंच्या अर्जावर 21 रोजी सुनावणी
भोसरी जमीन प्रकरणात खडसेंच्या पुन्हा वाढल्या अडचणी
मुंबई : भोसरी येथील बहुचर्चित भूखंड घोटाळा प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला असून नॉन बेलेबल वॉरंट जारी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे तर माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना वैद्यकीय कारणामुळे दिलासा मिळाला असून त्यांच्या अर्जावर आता 21 रोजी सुनावणी होणार आहे.
भोसरी जमीन प्रकरणामुळे वाढल्या अडचणी
एकनाथराव खडसे हे महसूल मंत्री असताना भोसरी येथील वादग्रस्त भूखंड त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे आणि जावई गिरीश दयाराम चौधरी यांनी खरेदी केल्याचे प्रकरण खूप गाजले होते. एकनाथराव खडसे यांना या प्रकरणी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता तर ईडीने सुद्धा या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात खुद्द एकनाथराव खडसे, मंदाताई खडसे आणि गिरीश दयाराम चौधरी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. यापैकी गिरीश दयाराम चौधरी हे सुमारे सव्वा तीन महिन्यांपासून कारागृहात आहेत. एकनाथराव खडसे यांची ईडीने आधी चौकशी केलेली असली तरी मंदाताई खडसे मात्र अद्यापपर्यंत ईडीसमोर हजर झालेल्या नव्हत्या. त्यांनी आपण आजारी असल्याचे पहिल्यांदा कारण सांगितले होते तर दुसर्यांदा त्यांनी मुदत वाढवून मागितली होती. दरम्यान, सतत गैरहजर राहत असल्यामुळे मंगळवारी मुंबई येथील सेशन कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत त्यांच्याविरोधात नॉन बेलेबल वॉरंट इशू केले असल्याची बातमी टीव्ही नाईन या मराठी वृत्त वाहिनीने दिली आहे. शिवाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत ट्वीटदेखील केले आहे.






Anticipatory Bail Application of Mandakini Khadse REJECTED.
Non Bailable Warrant Issued
Sessions Court Mumbai
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) October 12, 2021


