कंडारी गावातील रस्त्यांच्या कामाला मिळाली गती
आमदार संजय सावकारे यांचा पाठपुरावा ; 4.55 कोटी निधीतून विकासकामांचा शुभारंभ
भुसावळ : अनुसूचित जाती व नवबौध्द वस्त्या सुधारणा योजनेतंर्गत आमदार संजय सावकारे यांनी कंडारी, ता.भुसावळ गाव दत्तक घेऊन येथील विविध विकास कामांचा आराखडा तयार करण्यासाठी बांधकाम विभागाला कळविल्यानंतर बांधकाम विभागाचे अधिकारी आणि तत्कालीन सरपंच योगिता शिंगारे यांनी विकासकामांचा आराखडा तयार केला होता. आमदार सावकारेंनी शासनाकडे सलग पाच वर्षे पाठपुरावा केल्यानंतर 4.55 कोटींचा निधी मंजूर झाल्यानंतर नुकताच या कामाचा भूमिपूजन सोहळा झाला. प्रत्यक्षात कामांना लागली सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे होते. कंडारी प्रभारी सरपंच निर्मला घोडेस्वार, पंचायत समिती सभापती वंदना उन्हाळे, भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, माजी सभापती सुनील महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील, भाजयुमो जितेंद्र कोळी, प्रशांत निकम, खडका माजी सरपंच चुडामण भोळे, भाजपा सचिव दिलीप कोळी, ग्रा.वि.अधिकारी शिरतुरे, माजी सरपंच डॉ.सूर्यभान पाटील, माजी उपसरपंच यशवंत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य गौतम जोहरे, दीपक तायडे, नितीन पाटील, शारदा नंदु कोळी, संदीप शिंगारे, राहुल घोडेस्वार, चावदस मोरे, संजय मोरे, किरण जंगले, सुरेंद्र सोनवणे, शामराव मोरे, गजानन कोळी, शंकर मोरे, गोटू झोपे, हरीभाऊ महाजन, विनोद झोपे, विजय बार्हे, सोनू परदेशी यांची उपस्थिती होती.



या विकासकामांचा समावेश
गेल्या अनेक वर्षांपासून गावाचा विकास रखडला होता मात्र आमदार संजय सावकारेंच्या पाठपुराव्यामुळे आता रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. या निधीतून लिंपस क्लब ते कंडारी स्मशानभूमी पर्यंतचा रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, जेतवन बुध्द विहाराच्या जागेवर नवीन अद्ययावत दुमजली बुद्ध विहाराचे बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक दोनमध्ये जयंती मैदानावर नवीन अद्ययावत सामाजिक सभागृह बांधणे, नदी काठावर संरक्षण भिंत बांधणे, नवीन स्मशानभूमी बांधणे, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, प्रभाग क्रमांक तीनमध्ये अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, प्रभाग चारमध्ये अंतर्गत रस्ते डांबरीकरण तसेच काही ठिकाणी काँक्रिटीकरण, प्रभाग पाचमध्ये रस्ते डांबरीकरण तसेच पेव्हर ब्लॉक बसविणे व आवश्यक त्या ठिकाणी दोन शौचालयाचे बांधकाम केले जाणार आहे.
पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविणार : आमदार
आमदार संजय सावकारे सांगितले की, कामे पूर्ण होताच गावाच्या खरा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. आराखडे पूर्ण होऊन योजनेला लवकरात लवकर मंजूरी मिळवून गावातील पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न राहणार आहे. कार्यक्रम प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरीक व कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन भिका मोरे यांनी केले.
