धुळ्यात नशेच्या गोळ्यांची विक्री ; दोघांना अटक
धुळे : आझाद नगर पोलिसांनी नशच्या गोळ्यांची तसेच गांजाची विक्री करणार्या दोघांची मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून 90 हजार 404 रुपये किंमतीच्या नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. पप्पू शाबान अन्सारी उर्फ पप्पू चोर व मुन्ना शाबान अन्सारी उर्फ मुन्ना चोर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे शहरात नशेच्या गोळ्या व गांजाची विक्री केली जात असल्याची माहिती आझादनगर पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांद तारा चौकातील संशयीतांच्या घरासह दुकानातून पोलिसांनी 900 रुपये किंमतीच्या मानवी मेंदूवर परीणाम करणार्या गोळ्या तसेच 89 हजार 504 रुपये किंमतीच्या मानवी मेंदूला गुंगी आणणार्या गोळ्या जप्त करण्यात आल्या. जप्त गोळ्या या नार्कोटीग ड्रग व सायकोट्रॉपीक सबस्टन्स प्रकारात मोडतात.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, सहा.निरीक्षक दीपक पावरा, खलीदा सैय्यद, हवालदार सुनील पाथरवट, नाईक विजय शिरसाठ, कॉन्स्टेबल आतीक शेख, शोएब बेग, सचिन वाडीले यांच्या पथकासह औषध निरीक्षक प्रशांत ब्राह्मणकर यांच्या पथकाने केली.

