मंत्री नवाब मलिकांचे डोके तपासण्याची गरज : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
मुंबई : मंत्री नवाब मलिक यांचे डोके ठिकाणावर आहे का हे तपासण्याची गरज असून खाद्या मानसोपचारतज्ज्ञांकडून त्यांची तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचा टोला भाजपचे विधान परीषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. नवाब मलिक यांनी एक फोटो ट्विट करत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून, रोज ड्रग्ज घेतल्यावर नशाबाज जसे खोटेनाटे आरोप करतात तसेच रोज आरोप करण्याची नशा त्यांना लागली आहे, अशी टीका त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मलिकांना वैफल्याने ग्रासले
नवाब मलिक यांचा चेहरा व देहबोली पाहिली तर ते वैफल्याने पूर्णपणे ग्रासलेले दिसत आहेत. म्हणूनच ते भाजप व भाजपच्या नेत्यांवर अशी बेताल वक्तव्य करत आहेत. अशाच प्रकारे त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावरही टीका टिप्पणी केली आहे. महिलांच्या संदर्भात व एखाद्याच्या कुटुंबियांवर टीका करताना त्यांची किळसवाणी प्रवृत्ती दिसून येते, अशी घणाघाती टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.


नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा
संविधानाच्या चौकटीमध्ये एखादा मंत्री मंत्रिपदाची शपथ घेताना मी कोणाशी द्वेष भावनेने वागणार नाही, असूया करणार नाही. जातीपातीच्या संदर्भात माझी भूमिका न्याय्य असेल, अशी शपथपूर्वक सांगतो, ही संविधानाची चौकट आहे. पण या चौकटींचे उल्लंघन नवाब मलिक यांच्याकडून होत आहे. समीर वानखेडे मुस्लिम असल्याचे सिद्ध करण्याचा त्यांचा केविलवाणा अट्टहास सुरू आहे. ते दलित आहेत की मुस्लिम आहेत हे सिद्ध करण्याचा प्रकार आतापर्यंत कधीच झाला नव्हता. हे त्या पदाला शोभा दणारे नाही. त्यामुळे नवाब मलिक यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले : याचे परीणाम भोगावे लागतील
महाविकास आघाडीतील नेते, मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून बेछुट आरोप सुरू केले आहेत. समीर वानखेडेंवर आरोप करताना त्यातून होणार्या परीणामाची काळजी करावी पण यामध्ये भारतीय जनता पक्षाला ओढण्याचे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याचे परीणाम खूप भोगावे लागतील, असा सूचक इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.