रावेरातील शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट
नागरीकांची कामे खोळंबली : जिल्हाधिकारी राऊत यांनी लक्ष घालण्याची अपेक्षा
रावेर : दीपोत्सवात शासकीय कार्यालयांना सुटी नसलीतरी सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शहरातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट जाणवल्याने कामे घेवून आलेल्या नागरीकांना आल्या पावली माघारी परतावे लागले. वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात झाली असून शासकीय सुटी नसतानादेखील अनेक कार्यालयात स्मशानशांतता दिसून आली. दिवाळीमुळे अनेक कर्मचार्यांनी दांड्या मारत कार्यालयात येणे टाळल्याने ग्रामीण भागातून तक्रारी घेऊन येणार्यांनी कमालीची नाराजी व्यक्त केली.
शासकीय कार्यालय पडले ओस
वसुबारसपासून दिवाळी पर्व सुरू झाले असून शासकीय सुटी नसताना अनेक कार्यालय ओस पडल्याचे दिसून आले. सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असून मंगळवार व बुधवारी शासकीय कार्यालयांमध्ये अनेक ठिकाणी शुकशुकाट जाणवला. अनेक अधिकारी व कर्मचारी सुटी नसताना कार्यलायत नव्हते त्यांनी दांड्या मारल्याने ग्रामीण भागातून तक्रारी घेऊन आलेल्या नागरीकांमध्ये नाराजीचा सुर व्यक्त करण्यात आला. दांडी मारणार्या कर्मचार्यांवर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



या कार्यालयात होता शुकशुकाट
शासकीय सुटी नसतांना वन विभाग, शिक्षण विभागात, तालुका कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख विभाग, जलसंधारण विभाग एकात्मिक बाल विकास विभाग, पशु वैद्यकीय विभाग, पंचायत समितच्या अनेक विभागात कर्मचारी नसल्याने कामे घेवून आलेल्या नागरीकांना आल्या पावली माघारी परतावे लागले.
तहसील देवगुणे मात्र तहसील कार्यालयात
तहसीलदार उषाराणी देवगुणे सकाळपासून कार्यालयात येऊन जनतेच्या समस्या सोडवित असल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले तसेच गटविकास अधिकारी दीपाली कोतवालदेखील कार्यालयात थांबून जनतेच्या समस्या सोडवताना दिसून आल्या. रावेर पोलीस स्टेशनलादेखील निरीक्षक कैलास नागरे हे नागरीकांच्या तक्रारी ऐकताना दिसून आले तर अन्य कार्यालयात मात्र अधिकार्यांसह कर्मचारी गायब झाल्याने कामे घेवून आलेल्यांचा भ्रमनिरास झाला.
