भाजपा नेते निलेश राणेंचा यावलमध्ये निषेध : गुन्हा दाखल करण्याबाबत सेनेचे निवेदन


यावल : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात अपशब्दांचा वापर करणारे भाजप नेते निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करून केली.

आक्षेपार्ह शब्द वापरून पालकमंत्र्यांचा अपमान
शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तुषार सांडूसिंग पाटील यांनी यावलच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, 5 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे एका सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित होते. हा कार्यक्रम मुस्लीम बांधवानी आयोजित केला होता. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लोकाग्रहास्तव कव्वालीचे गायन केले मात्र या कव्वाली गायनानंतर भाजपचे नेते निलेश नारायण राणे यांनी आपल्या व्टिटर अकांऊटवरून कव्वालीवरून अतिशय खालच्या स्तरावरून टीका केली. निलेश राणे यांचे वक्तव्य हे अतिशय कुटील हेतूने लिहिलेले आहे. या लिखाणातून धर्माबद्दल असलेला त्यांचा कुटील हेतू लक्षात येतो. राणे यांनी आमच्या नेत्यांबद्दलची असलेली जनमानसातली प्रतिमा तसेच त्यांच्या लौकिकास बाधा निर्माण होईल, असे हेतु पुरस्करपणे शब्द वापरून नेत्याची अब्रुनुकसानी केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजमल पठाण यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जाव्दारे करण्यात आली. या तक्रार अर्जावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तुषार सांडूसिंग पाटील, रवींद्र सोनवणे, जगदीश कवडीवाले, शरद कोळी, हुसेन तडवी, पप्पू जोशी, संतोष खर्चे, योगेश चौधरी, अनिल पाटील, भरत चौधरी, अजहर खाटीक, अ‍ॅड.भरत चौधरी, प्रवीण लोणारी, सुनील बारी, सागर बोरसे, पिंटू कुंभार, संतोष वाघ आदींसह अन्य शिवसैनिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !