फुलगाववासीयांच्या वाढीव वस्तीमधील अंधार होणार दूर : संतोष सोनवणे
भुसावळ : तालुक्यातील फुलगाव येथील ग्रामपंचायत वाढीव हद्दीतील वस्तीमध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून पथदिवे (स्ट्रीट लाईट) चा प्रश्न प्रलंबित होता. वस्तीत राहणार्या नागरीकांना अनेक असुविधांना सामोरे जावे लागत होते. फुलगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य नीळकंठ एकनाथ चौधरी यांनी पुढाकार घेऊन वाढीव वस्तीमधील 33 स्ट्रीट लाईट पोलचा प्रस्ताव ग्रामपंचायतीकडून तयार करून घेऊन महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे 3 नोव्हेंबर रोजी सादर केला होता. हा पालकमंत्र्यांनी लागलीच दखल घेत जिल्हाधिकार्यांना मंजुरीबाबत आदेश दिल्याने लवकरच वाढीव वस्तीतील अंधार दूर होणार आहे. ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्य नीळकंठ चौधरी व शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख व पदाधिकारी यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
