सामाजिक वनीकरण अधिकार्यांमुळे शासनाच्या निधीचा दुरुपयोग
बोदवड येथे अंदाजपत्रकानुसार काम न केल्याने वृक्षांची नासधूसचा आरोप
बोदवड : तालुक्यातील नांदगाव येथील नांदगाव ते पळासखेडा दुतर्फा वृक्ष लागवड ही अंदाजपत्रकानुसार न केल्याने वृक्षांची नासधूस होत आहे. रस्ता नुतणीकरणाचे काम प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना अंतर्गत अंदाजीत 3 ते 4 किलोमीटर रस्त्याचे नुतनीकरणाचे काम सुरू आहे. संबंधित रोजगार सेवक व सामाजिक वनीकरण वनपाल यांच्या दुर्लक्षामुळे वृक्षांची नासधूस होत असल्याचा आरोप आहे. संबंधित अधिकारी व रोजगार सेवक, यांनी अंदाजपत्रकानुसार काम न केल्याने शासनाच्या पैशाचा दुरुपयोग झाल्याचा उघड आरोप आता होत आहे. नासधूस झालेल्या वृक्षांची भरपाई कोण करून देणार ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. संबंधित वृक्ष लागवड करताना संबंधित ग्राम रोजगार सेवक गौतम निकम व अधिकार्यांनी वेळेवर काळजी घेतली असती तर शासनाच्या निधीचा दुरुपयोग व शासनाचे नुकसान झाले नसते, अशी चर्चा आता होत आहे.
तक्रारींना केराची टोपली
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने वारंवार तक्रार करून सुद्धा संबंधित रोजगार सेवक यांनी केलेला गैरप्रकार व सामाजिक वनीकरण कर्मचारी व अधिकारी यांच्यावर ती अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसून येत नाही. लवकरच उपोषणाच्या माध्यमातून संबंधित अधिकारी यांना जागे करून देण्यात येणार असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ तालुकाध्यक्ष चेतन पाटील व जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन आसने यांनी सांगितले.



