आमदार संजय शिरसाठ यांचा मुक्ताईनगरात निषेध
मुक्ताईनगर : आमदार संजय शिरसाठ यांचा मुक्ताईनगरातील ग्रामसेवक संघटनेतर्फे निषेध करण्यात आला. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना तालुका मुक्ताईनगर यांच्या वतीने एकदिवसीय कामबंद आंदोलन करून आमदार संजय शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वार करण्यात आली.
बेताल वक्तव्याचा निषेध
औरंगाबाद येथे आमदार संजय शिरसाठ यांनी 8 ऑक्टोंबर रोजी औरंगाबाद येथे सरपंच प्रशिक्षण कार्यशाळेत भाषण करताना शासकीय व्यासपीठावरून ग्रामसेवक संवर्गाबद्दल अपशब्द वापरून ग्रामसेवक संवर्गाची बदनामी केली. या प्रकाराने महाराष्ट्रातील ग्रामसेवकांबद्दल चुकीचे वातावरण तयार झाले. आमदार शिरसाठ यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी पोलीस निरीक्षक यांना व विस्तार अधिकारी जैन यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्राम सेवक संघटनेचे अध्यक्ष सुभाष भागवत पाटील, उपाध्यक्ष विनोद महाजन, सचिव रवींद्र कडू नागरुत, मनोहर रोकडे, आर एस.चौधरी, भारत भूषण इंगळे, विकास महाजन, कुंभारे आप्पा, राजाराम कठोरे आदी ग्रामसेवक उपस्थित होते.


