भुसावळात घरगुती गॅसचे अवैधरीत्या वाहनात रीफिलिंग : म्होरक्या जाळ्यात
भुसावळ : नाशिक आयजींच्या विशेष पथकाने भुसावळातील खडका रोड भागातील पटेल कॉलनीत अवैधरीत्या घरगुती गॅस सिलिंडर रीफिलिंग करताना कारवाई केली होती मात्र म्होरक्या पसार झाला होता. त्याच्या सोमवारी बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर मुसक्या आवळण्यात आल्या. वसीम अब्दुल मशीद पटेल (33 रा.पटेल कॉलनी, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
तीन आरोपींना झाली होती
शुक्रवार, 12 रोजी विशेष पथकाने नऊ सिलिंडरसह दोन रीक्षा व अन्य मुद्देमाल मिळून एक लाख सात हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात केला होता तर अवैधरीत्या गॅस वाहनात भरणार्या सलमान अब्दुल माजीद पटेल (30, पटेल कॉलनी, खडका रोड, भुसावळ) तसेच रीक्षा चालक आरीफ खान इसाफ खान (35, जाम मोहल्ला, भुसावळ) व जकाउल्ला खान असदउल्ला खान (43, खडका रोड, रामदासवाडी, भुसावळ) यांना अटक केली होती.
गोपनीय माहितीवरून आरोपीला अटक
दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी वसीम पटेल हा वरणगाव रोड भागात आल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विकास सातदिवे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, निलेश चौधरी, कॉन्स्टेबल ईश्वर भालेराव, प्रशांत सोनार, सहा.फौजदार तस्लीम पठाण आदींनी केली. तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाजन करीत आहेत.


