सोनगीर पोलिसांनी केला पाच लाखांचा गुटखा जप्त
दोघांविरोधात गुन्हा दाखल : एकूण नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त
शिरपूर : दोंडाईचाकडुन धुळ्याकडे अवैध गुटख्याची चोरटी वाहतूक करणार्या वाहनावर सोनगीर पोलिसांनी सोनगीर फाट्यावर बुधवारी रात्रीच्या सुमारास धडक कारवाई करीत 5 लाख 29 हजार 848 रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य गुटका ताब्यात घेत एकूण 9 लाख 29 हजार 848 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईने गुटख्याची अवैध वाहतूक करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
दोंडाईचाकडुन धुळ्याकडे एका ईको गाडीतुन अवैधरीत्या गुटका वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांना मंगळवारी मध्यरात्री मिळाल्याने त्यांनी पथकासह सोनगीर फाट्यावर सापळा रचला. बुधवारी मध्यरात्री अडीच ते 3 वाजेच्या सुमारास इको गाडी (क्रं.एम.एच.21 व्ही.2763) हिस थांबवून चौकशी करीत तपासणी केली असता गाडीत महाराष्ट्र शासनाने विक्रि व आयात निर्यात व उत्पादनासाठी बंदी घातलेला पाच लाख 29 हजार 848 रुपये किंमतीचा केसर युक्त विमल पानमसाला व तंबाखू जप्त करण्यात आली.

चालकासह दोघांना अटक
सोनगीर पोलिसांनी गुटखाजन्य पदार्थ ताब्यात घेत चार लाख रुपये किमंतीची ईको गाडी (क्र .एम. एच.21 /व्ही 2763) असा एकूण 9 लाख 29 हजार 848 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून चालक अहमद इरफान अन्सारी (रा. गफुर नगर वडजाई रोड, धुळे) व त्यांचा साथीदार लतीफ बैजु मेहतर (29, रा. नटराज टॉकीजवळ, गल्ली नं.7 , काझी अतिक्रमण वस्ती, धुळे ) यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर हिंमतराव बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पीएसआय नामदेव सहारे हे करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे, संजय जाधव, अमरीश सानप, विजयसिंग पाटील आदींनी केली.

