एस.टी.कामगार आंदोलन : भाजप आमदार सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनातून घेतली माघार


मुंबई : गेल्या 18 दिवसांपासून सुरू असलेलं एसटी कामगारांचं आंदोलन आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं दिलेली वेतनवाढ व इतर मागण्यांवर घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचं म्हणत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. एसटी कामगारांनी उभारलेल्या लढ्याला मोठं यश आलं आहे. आता पुढील निर्णय कामगारांनी घ्यावा असंही खोत यांनी म्हटलं. यावेळी गोपीचंद पडळकरदेखील त्यांच्यासोबत होते.

पाठिंबा देण्यासाठी उतरल्याचा दावा
राज्य सरकारनं बुधवारी एसटी कर्मचार्‍यांना वेतनवाढ जाहीर झाली केली. त्यानंतर भाजप आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनातून माघार घेत असल्याची घोषणा केली. एसटी कर्मचार्‍यांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनात आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी उतरलो होतो, असे सदाभाऊ खोत म्हणाले. एसटी कर्मचार्‍यांना चांगली वेतनवाढ मिळाली आहे. मात्र एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण करण्याची महत्त्वाची मागणी अद्यापही प्रलंबित आहे. सध्या विलिनीकरणाचा मुद्दा कोर्टात आहे. आंदोलनाला पहिल्या टप्प्यात मिळालेलं यश मोठे असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आंदोलनात उतरलो होतो, असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं. एस.टी.संप आम्ही चिघळवला असल्याचा आरोप निराधार असल्याचं त्यांनी म्हटलं.



दुसर्‍या टप्प्यात आंदोलन केल्यास सोबत राहणार : खोत
राज्य सरकार एसटी कर्मचार्‍यांच्या पगार कमी पडणारी रक्कम देणार आहे. दोन पावलं सरकार पुढं आलं आहे. पहिला टप्पा जिंकलो आहे. न्यायालयातून जो निर्णय येईल. आम्ही दुसर्‍या टप्प्यात कामगारांनी आंदोलन केल्यास आम्ही त्यांच्यासोबत राहू. निलंबन आणि सेवासमाप्ती मागे करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कामगारांचा मोठा विजय आहे.

आझाद मैदानातील आंदोलनातही फूट
एस.टी. कर्मचारी आणि सरकार यांच्यात काही चर्चेच्या फेर्‍या झाल्या. त्यातल्या दोन फेर्‍यांमध्ये भाजपचे आमदार पडळकर आणि खोत यांनी कर्मचार्‍यांचे प्रतिनिधी म्हणून भाग घेतला. काल जी परीवहन मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यातही हे दोन्ही नेते हजर होते. त्यांच्या उपस्थितीतच पगारवाढीची घोषणा केली गेली. पण घोषणा होताच, आझाद मैदान तसच राज्यभर आंदोलन करणार्‍या एसटी कर्मचार्‍यांनी पगारवाढीवर नाराजी व्यक्त केली. कर्मचार्‍यांचा वाढता रोष पहाता, खोत आणि पडळकर यांनी सावध भूमिका घेत, आज सकाळी निर्णय जाहीर करु असं म्हटलं होतं. त्यानुसारच खोत आणि पडळकर दोघांनीही आंदोलनातून माघार घेत असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे त्यांनी ही घोषणा आझाद मैदानावर न करता, बाजूला येत पत्रकारांसमोर केली. म्हणजेच आझाद मैदानावरील आंदोलक आणि खोत-पडळकर यांच्यात मतभेद झालेले आहेत आणि सध्या तरी भाजपचे दोन्ही आमदार आंदोलनातून बाहेर पडले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !