बालरंगभूमी परिषदेच्या ‘कला संस्कार शिबिरा’साठी जळगावचा बालचमू कोल्हापूरकडे रवाना


जळगाव (10 मे 2026) : बालमनावर कलेच्या माध्यमातून सुसंस्कार व्हावेत आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, या उदात्त हेतूने कोल्हापूर येथील कणेरी मठ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘कला संस्कार शिबिरा’साठी जळगाव जिल्ह्यातील 40 बालकांचा संघ आज उत्साहात रवाना झाला.

तीन दिवसीय निवासी शिबिर
बालरंगभूमी परिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेमार्फत या बालकांच्या प्रवासाचे नियोजन करण्यात आले आहे. 10 मे ते 12 मे 2026 या कालावधीत चालणार्‍या या तीन दिवसीय निवासी शिबिरात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. विशेष म्हणजे, हे शिबिर पूर्णपणे विनामूल्य आह. यात ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांतील मुलांचा समावेश आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत शिबिरार्थींना केवळ पुस्तकी ज्ञान न देतो प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण दिले जाणार आहे. शिबिरा चित्रकला, मास्कमेकिंग, नृत्य, नाट्य आणि संगीताच्या माध्यमातून मुलांमध्ये सर्जनशीलता जोपासली जाईल तर प्रार्थना, श्लोक पठण, योगाभ्यास व प्राणायामातून त्यांना आपल्या भारतीय संस्कृतीची व संस्कारांची माहिती दिली जाईल.



तज्ज्ञांकडून प्रशिक्षण
आजच्या मोबाईलच्या जमान्यात लुप्त होत चाललेले मैदानी आणि पारंपारिक खेळ लगोरी, खो खो, कबड्डी, भोवरा, विटीदांडू, पतंग उडवणे या खेळांची माहिती देण्यासह हे खेळ खेळता येणार आहेत. स्वसंरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त असलेले ‘लाठी-काठी’चे विशेष प्रशिक्षण तज्ज्ञांकडून दिले जाईल. सापांविषयी असलेले गैरसमज दूर करून पर्यावरणाचे रक्षण कसे करावे, याचे शास्त्रीय ’सर्पज्ञान’ मुलांना दिले जाणार आहे. याशिवाय ग्राशजीवनाची माहिती देणार्‍या या शिबिराच्या निमित्ताने मुलांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या जगप्रसिद्ध ‘सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालयाला ही बालके भेट देणार आहेत.

इच्छादेवी चौकातून ट्रॅव्हल्समधून निघालेल्या चमूला निरोप देतांना बालरंगभूमी परिषद जळगावचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे व पदाधिकारी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा उपक्रमांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना आपल्या संस्कृतीची जवळून ओळख होते, अशी भावना यावेळी कमल राजाराम वाणी प्राथमिक विद्यालयाचे प्राचार्य डॉ.रविंद्र माळी यांनी शिबिरार्थींशी बोलतांना व्यक्त केली.

कोल्हापूरच्या पवित्र कणेरी मठात होणारे हे शिबिर जळगावच्या या 40 बालकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार असून, शिबिर संपवून परतताना हे बालक नवनवीन कौशल्ये आत्मसात करून परततील, असा विश्वास बालरंगभूमी परिषद अध्यक्ष योगेश शुक्ल यांनी व्यक्त केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !