भुसावळातील नाहाटा चौफुलीवर होणार सुशोभीकरण
आमदारांच्या नहींच्या अधिकार्यांना सूचना : अपूर्ण कामे लवकरच होणार पूर्ण
भुसावळ : भुसावळातील नाहाटा चौफुलीजवळील चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून लवकरच सुशोभीकरणाच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. या संदर्भात नहींचे रीजनल प्रोजेक्ट डायरेक्टर सिन्हा यांच्याशी रविवारी आमदार संजय सावकारे यांनी चर्चा करीत काही सूचनाही केल्या.
नाहाटा चौफुलीचे रूप पालटणार
नाहाटा चौफुलीजवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उड्डाणपुलाची उभारणी केली असून पुलाखालून शहरात येणार्या वाहनांना एंट्री देण्यात आली आहे तर ट्रँगल असलेल्या या चौफुलीवर छोटेसे उद्यान वा सुशोभीकरणाच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना आमदारांनी प्रसंगी केली. यावेळी अंडरपास जॉईन करणे, ठिकठिकाणी सुशोभीकरण करण, वृक्षारोपण तसेच काही कामे जी नहींकडे नमूद नाहीत ती पूर्ण करण्याच्या सूचना तसेच प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनादेखील प्रसंगी करण्यात आल्या.
यावेळी कंत्राटदार सुजाण सिंग, नहींचे अभियंता, नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते सतीश सपकाळे, अजय नागराणी, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, माजी नगरसेवक निकी बत्रा, विशाल जंगले व अयोध्या नगर स्वरूप कॉलनीतील नागरीक उपस्थित होते.


