तांदलवाडीत केळीवर औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर
खिर्डी : केळी निर्यातीत झेप घेतलेल्या तसेच केळीचे नंदनवन समजल्या जाणारे तांदलवाडी (ता.रावेर) हे गाव सातत्त्याने प्रयोगशील वृत्तीने चर्चेत असते. केळी पिकवणार्या या गावात जिल्ह्यात सर्वप्रथम ड्रोन यंत्राच्या सहाय्याने औषध फवारणीच्या प्रयोगाला सुरूवात करण्यात आली आहे. केळी उत्पादक शेतकर्यांचा शेतीत नवनवीन प्रयोग करण्यात हातखंडा आहे. असाच प्रयोग परीसरातील केळी बागेवर तसेच तुरीवर ड्रोनद्वारे औषध फवारणीचा सुरू आहे.
200 एकरावर ड्रोनद्वारे फवारणी
अकोला येथून ड्रोनयंत्र मागवून तब्बल 200 एकरावर ड्रोनद्वारे फवारणीचा प्रयोग राबवत असल्याची माहिती महाजन बनानाचे संचालक प्रेमानंद महाजन व प्रशांत महाजन यांनी दिली. या परीसरात केळीवर करपा वाढत असल्याने त्याला आटोक्यात आणण्यासाठी फवारणी करत असतांना केळीच्या वरपर्यंत असलेल्या पानांवर साध्या फवारणी पंपाने औषध पोहोचत नाही यासाठी ड्रोनचा चांगला वापर होत असून अन्नद्रव्याची फवारणी होऊ शकते. मोठ्या झालेल्या तुरीसाठीही ड्रोनचा चांगला वापर होत आहे. तुरीला पंप घेऊन माणसाने फवारणी केली असता फुलगळ होते तसेच दाट तूरीमध्ये चालताही येत नाही. ड्रोनद्वारे एकदा 10 लिटर मिश्रण घेवून 10 ते 15 मिनिटात एका एकर क्षेत्रावर फवारणी केली जाते असून मजुरांच्या टंचाईवर पर्यायदेखील ड्रोन निर्माण झाला आहे. मनुष्यबळ व पाण्याची बचत होत असून वेळ आणि खर्च वाचत आहे. ड्रोनद्वारे फवारतांना ड्रोनचे दवबिंदू असल्याने प्राथमिकदृष्टया फायदेशीर असल्याचे प्रशांत महाजन यांनी सांगितले.


