उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जळगावात जल्लोषात स्वागत
जळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जळगाव विमानतळावर शुक्रवारी सकाळी 8.15 वाजेच्या सुमारास आगमन झाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले. याप्रसंगी माजी महसूलमंत्री मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि.प. सीईओ डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी पदाधिकार्यांकडून जल्लोषात स्वागत
उपमुख्यमंत्री विमानतळावून अजिंठा विश्रामगृहाकडे जात असतांना पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्याजवळ महानगर राष्ट्रवादीतर्फे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर ते अजिंठा विश्रामगृहात निवडक सहकार्यांशी त्यांनी संवाद साधला. जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या आढावा बैठकीला उपस्थित देत त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला. यानंतर जळगाव जिल्हा सहकारी दुग्ध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव- नवीन आधुनिक दूध प्रक्रिया व पॅकींग प्लँट आणि नवीन दुग्धजन्य पदार्थ उत्पादन प्लँटचा उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते होणार आहे.


भुसावळात दुपारी सरदार पटेल पुतळ्याचे लोकार्पण
उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवार, 17 रोजी दुपारी एक वाजता जुना सातारा भागातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. यावेळी भुसावळ पालिकेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन पवार यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. लोकार्पण सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास उपस्थितीचे देण्याचे आवाहन नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष राजेंद्र नाटकर व मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी केले आहे.
समीकरणे बदलणार : जम्बो पदाधिकार्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
भुसावळ शहरातील आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर दुपारी दिड वाजता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा होईल. या मेळाव्यात भुसावळ शहर विभागातील पदाधिकार्यांचा पक्ष प्रवेश होईल. भुसावळ शहरातील 18 विद्यमान तर चार माजी नगरसेवक यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे संकेत आहेत.
यांची मेळाव्यास राहणार उपस्थिती
राष्ट्रवादीच्या मेळाव्यास माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी सभापती अरुणभाई गुजराथी, माजी खासदार वसंतराव मोरे, माजी खासदार ईश्वर जैन, माजी पालकमंत्री सतीश अण्णा पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार व पदाधिकारी मोठ्या संख्यंने उपस्थित राहणार आहेत. उपस्थितीचे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्रभैय्या पाटील, भुसावळ शहराध्यक्ष नितीन धांडे व पदाधिकार्यांनी केले आहे.
