दिसत नाही का ? म्हटल्याचा राग आल्याने चौघांचा तरुणावर प्राणघातक हल्ला
जळगाव : शहरातील रेडक्रॉस सोसायटीजवळ दुचाकीने जणार्या तरूणाला चौघांकडून लोखंडी सळईने बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शाब्दीक वादातून हाणामारी
पिंप्राळ्यातील वेल्डिंग कामगार जावेद सिकंदर पिंजारी (28) हा तरुण शुक्रवारी रेडक्रॉस सोसायटी जवळील रस्त्याने दुचाकी (एम.एच.19 ए.एफ.8015) ने जात असताना डिव्हायडर ओलांडून जावेदच्या दुचाकीसमोर एक अनोळखी तरुण आला. दुचाकीसमोर आलेल्या तरूणाला तक्रारदार जावेद यांनी तुला दिसत नाही का ? असे बोलल्याचा राग आल्याने त्या तरुणांसह आणखी इतर तीन जणांनी जावेदसोबत वाद घातला तसेच तिघांनी त्याला पकडून ठेवले. तर एकाने लोखंडी पट्टीसह लोखंडी सळईने डोक्यात मारहाण करून दुखापत केली. त्यानंतर चौघेही घटनास्थळावरून पसार झाले. या घटेत जावेद हा जखमी असून त्याच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोकुळ गवारे करीत आहेत.





