दीपनगरात जेवणाच्या डब्यातून कॉपर प्लेट चोरुन नेणारा कामगार जाळ्यात


भुसावळ : दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 500 मेगावॅट प्रकल्पातून कॉपर प्लेट जेवणाच्या डब्यात लपवून चोरी करताना एक रोजंदारी कामगार सरप्राईज तपासणीत आढळून आला. या रोजंदारी कर्मचार्‍याला कामावरुन तडकाफडकी कमी करण्यात आल्याची माहिती सुरक्षा विभागाचे वरीष्ठ व्यवस्थापक आर. डी. पाटील यांनी दिली.

सोमवारी घडली घटना
दीपनगरातील 500 मेगावॅट प्रकल्पात सोमवारी कामाची शिफ्ट सुटल्यानंतर सुरक्षा विभागाने अचानकपणे तपासणी मोहिम राबवली. या मोहिमेत साकरी येथील रहिवाशी ठेकेदाराकडील रोजंदारी कामगार अनिल वारके याच्या जेवणाच्या डब्यात सुमारे एक फुट लांब कॉपरची आर्थिंग प्लेट वेटोळे केलेल्या स्थितीत आढळून आली. या प्रकरणी सुरक्षा विभागाने संबंधीत ठेकेदाराला बोलावून हा प्रकार निदर्शनास आणून दिला. सुमारे 400 रुपये किंमतीची ही प्लेट असल्याने पोलिसांत गुन्हा दाखल न करता या कामगाराला शिक्षा म्हणून त्याला कामावरुन तातडीने काढण्यात आले. या घटनेमुळे दीपनगरात खळबळ उडाली. सरप्राईज तपासणी झाली म्हणून हा प्रकार समोर आला. दररोज तपासणी झाल्यास असे अनेक प्रकार समोर येतील, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान या कर्मचार्‍याला तातडीने कामावरुन कमी केले आहे. सरप्राईज तपासणी कसून केली जाईल, असे सुरक्षा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक आर. डी. पाटील यांनी सांगितले. याबाबत रात्री उशिरापर्यंतही तालुका पोलिसांत गुन्हा दाखल नव्हता.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !