सावदा पालिकेच्या सभेत 32 विषयांना मंजुरी
सावदा : सावदा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवार, 22 रोजी होवून 32 विषयांना मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अनिता येवले होत्या. नवीन नगरपालिका सभागृहास कै.प्रभाकर बुला महाजन यांचे नाव न दिल्यास सभेवर बहिष्कार टाकणार असल्याचे नगरसेवक राजेश वानखेडे यांनी सांगितले होते यामुळे यासभेकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते.
वानखेडे यांची मागणी अखेर पूर्ण
सभा सुरू झाल्यावर शहरातील कोचुर रोडवरील नवीन सभागृहास कै. प्रभाकर बुला महाजन यांचे नाव देण्याचा ठराव संमत झाल्याने राजेश वानखेडे यांनी केलेली मागणी पूर्ण झाली सोबत कोचुर रोडवरीलच जुन्या पालिका सभागृहास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे, स्टेशनरोडवरील जुन्या कन्या शाळेच्या जागेवर होत असलेल्या व्यापारी संकुलास वैकुंठवासी ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांचे नाव देण्याचे देखील सर्वानुमते ठरले. याचसोबत नवीन पाण्याची टाकी बांधण्यासाठी डेली भाजी मार्केटमधील जुन्या पाण्याच्या टाकीखालील शेड काढण्यासह सर्व 32 विषयांना यात मंजुरी मिळाली, सभेदरम्यान नगरसेवक राजेश वानखेडे, राजेंद्र चौधरी, फिरोज खान पठाण, सिद्धार्थ बडगे, सतीश बेंडाळे, नगरसेविका रंजना भारंबे, नंदाबाई लोखंडे आदींनी चर्चेत सहभागी होऊन समनव्याने मार्ग काढीत सर्व विषय मंजूर केले. सभेस उपनगराध्यक्ष विश्वास चौधरी, मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. सत्ताधारी गटातील गट नेते अजय भारंबे सभेस अनुपस्थित होते.


