माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सावदा पालिकेने नाशिक विभागात पटकावला तृतीय क्रमांक
सावदा : जुन 2021 ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत झालेल्या विविध कामाच्या मुल्यांकनावर आधारित नाशिक विभागात नगरपरीषद क्षेत्रात सावदा नगरपालिकेने तृतीय क्रमांक पटकावला आहे. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा या माध्यमातून जनजागृती करण्यात आले. या सर्वांचे मूल्यांकन करून दखल घेण्यात आली व सावदा पालिकेने माझी वसुंधरा अभियान नाशिक विभागात तृतीय क्रमांक पटकावला.
आणखी क्रमवारी उंचावण्याचा प्रयत्न
नागरीकांना बंदी असलेल्या प्लास्टीक वस्तु व पिशव्यांचा वापर न करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच सिंगल युज प्लास्टीक बंदीच्या अंमलबजावणीसाठी नगरपरीषद करीत असलेल्या उपाययोजना अंतर्गत अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याचे व सायकल, इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचे आवाहन करण्यात आले. त्या अनुषंगाने क्रमवारी टिकवून ठेवणे जास्त अवघड असून ज्या घटकामधे कमी गुण प्राप्त झालेले आहेत त्यावर अधिकाधिक भर देऊन क्रमवारी उंचावण्याचा यापुढे प्रयत्न केला जाईल, असे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी सांगितले. सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व नागरीकांचे आभारी असल्याचेही ते म्हणाले.


